माजी सर्वाध्यक्ष  कै. वै.वि. आठल्ये  यांनी १९८१ साली माघी उत्सवात झालेल्या आठल्ये संमेलन प्रसंगी केलेले भाषण

 

या संमेलनाचे स्वागताध्यक्ष चि. अरुण आठल्ये, उद्घाटक मा. शरदराव आठल्ये आर्किटेक्ट- मुंबई, प्रमुख पाहुणे मा. शशिशेखर काशिनाथ तथा आठल्ये गुरुजी, माजी आमदार व विद्यमान सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी व उपस्थित बंधू भगिनींनो,

प्रास्ताविक –

शिपोशीकर आठल्ये कुटुंबियांचे, त्यांचे माहेर वासिनींसह भरलेले, असे हे पहिले संमेलन होय. ज्या श्रीहरिहरेश्वराच्या कृपेने आजचा हा सुदिन आपल्या जीवनात उगवला त्याचे अव्यभिचारिणी भक्तीने प्रथम स्मरण करतो. अशा संमेलनाबद्दलची अनेक दिवसापासून मी माझ्या मनात बाळगलेली संकल्पना आज साकार झालेली पाहून त्याबद्दल आला मनोमन वाटणारा हार्दिक आनंद शब्दांकित करणे केवळ अशक्य आहे. माझ्याप्रमाणेच आपण सर्वांनाही तो तसाच होत असेलच, हे मी जाणतो. केवळ आपण सर्वांची सहानुभूती  सक्रीय सहकार्य यामुळेच आपले संमेलन आज अशा स्वरुपात साजरे होत आहे. त्याबद्दल आपणा सर्वांना मी मन:पूर्वक हार्दिक धन्यवाद देतो.

कुल संमेलन-

माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी असे कुलसंमेलन भरविण्यात कोणत्याही प्रकारचा संकुचितपणा नाही, इतकेच नव्हे तर, राष्ट्रीय एकात्मतेचे दृष्टीनेही अशी संमेलने, योग्य पथ्ये पळून भरविणे हे किती अगत्याचे आहे हे उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेच.

त्याबाबतीत मला एवढेच म्हणायचे आहे की, निसर्गातही ‘Birds of the same feather flock together’ हे आपण दररोज पाहत असतोच. त्याच न्यायाने अशी कुलसंमेलने भरली तर ती गोष्ट निसर्गमान्यच नव्हे काय? तसेच आजच्या विज्ञान युगातही, जगातील सर्वच राष्ट्रात, ‘Blood is thicker than water’ ही संकल्पना मान्यता पावलेली आहे. त्या दृष्टीनेही, आपण सर्व मूलत: एक कुटुंबीय असल्यामुळे, आपण सर्वात एक रक्त खेळत आहे व त्यायोगे आपणास एकमेकांबद्दल जास्त जवळीक-प्रेम-आत्मीयता वाटत असेल तर, ते मानवमान्यच नव्हे काय?इतकेच नव्हे तर, ‘United we stand divided we fall’ ही म्हण तरी अन्य काय दर्शविते? एक कुटुंबीय म्हणून आपण सर्व संघटीत राहिलो तर जगू शकू, हेच सत्य, त्या म्हणीतही अनुस्यूत नाही काय? यावर कोणी म्हणेल की या म्हणीतील We हा शब्द राष्ट्रांतील सर्व नागरिकांकरिता वापरण्यात आलेला आहे. पण त्यावर मला असे म्हणावेसे वाटते की, त्या सर्व नागरिकांत आपणही सर्व येतोच की नाही? कोणत्याही भाषेतील म्हणी या अनेक वर्षांचे अनुभवाने सिद्ध झालेले सिद्धांत असतात. वरील तीनही इंग्रजी भाषेतील म्हणी तशाच आहेत. फार काय, अशा प्रकारे अखिल राष्ट्राची संघटना उभारताना, अशा निरनिराळ्या कुळांची एकजिनसी संघटनाच जास्त उपकारक होणार नाही का? मला तर वाटते की, निश्चितपणे होईल. पण केव्हा? याचे उत्तर अगदी सरळ आहे ते हे की. अशा प्रत्येक कुलसंघटनेने, आपण अखिल राष्ट्रीय संघटनेचा एक अविभाज्य भाग आहोत याचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे म्हणजे झाले. असे झाले म्हणजेच आज राष्ट्राला अभिप्रेत व जरूर असलेली Unity in diversity (अनेकात्वातून एकात्मता) ही सिद्ध होऊ शकेल वश प्रकारे अशा कुलसंघटनाही राष्ट्रमान्य होऊ शकतील. सारांश, निसर्ग, मानव व राष्ट्र यापैकी कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी, अशा  कुलसंघटना ह्या राष्ट्रीय एकात्मतेला पोषकच ठरतील यांत मला तरी संदेह वाटत नाही.

कुल म्हणजे काय?

कुलाची कल्पना पुरातन आहे. मानव आहे निसर्गत: समाज करून राहणारा प्राणी आहे; त्यामुळे एकाच कुळातील लोकांना एकमेकांबद्दल विशेष प्रेम-आदर-अभिमान-जवळीक-आपुलकी-आत्मीयता-एकात्मता वाटते हे कोणालाही न नाकारता येण्याजोगे म्हणजेच त्रिकालाबाधित सत्य आहे. “विग्रह संग्रह” ग्रंथात खालीलप्रमाणे कुल-लक्षणे सांगितली आहेत.

आचारो विनयो विद्या प्रतिष्ठा तीर्थ-दर्शनम् l

निष्ठा वृत्तीस्तपो दानम् नवधा कुललक्षणम् ll

या सर्व लक्षणांनी आपले शिपोशीकर आठल्यांचे कुल हे विभूषित आहे व त्यामुळेच एक “ आदर्श कुल-संघटना” आपल्यात निर्माण झालेली आहे व ती श्री श्रीहरिहरेश्वर कृपेने यापुढेही तशीच राहील असा मला विश्वास वाटतो

आठल्ये कुल-

दक्षिणी ब्राह्मणात कऱ्हाडे ब्राह्मण, हा एक पोटभेद असून, आपले आठल्ये कुल हे त्यातील एक आहे. कऱ्हाडे जातीत एकूण ५४५ उपनावे असून, यापैकी २०२ उपनावे नावाच्या पुढे “कर” हा प्रत्यय लावून झालेली आहेत. कऱ्हाड्यात एकूण गोत्रे २४ आहेत. सर्व कऱ्हाडे ब्राह्मण “एकवेदी” (ऋग्वेदी), “एकसूत्री” (आश्वलायन सूत्री) व “एकशाखी” (शाकल शाखी) आहेत. त्यापैकी आठल्ये कुळाचे गोत्र काश्यप आहे. त्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकाला उपनयन प्रसंगी आपल्या गुरूला नम्रतापूर्वक खालीलप्रमाणे अभिवादन करण्याची दीक्षा दिली जाते.

काश्यपाऽवत्सारासीतेति त्रिप्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्नोहं ॠग्वेदांतर्गत आश्वलायनसूत्र शाकल शाखाध्यायी ll

......शर्माऽहं भो गुरुत्वां अभिवादयामिll

अर्थ- काश्यप, अवत्सार व असित या तीन प्रवारांनी युक्त अशा काश्यप गोत्रात उत्पन्न झालेला ऋग्वेद शाकालशाखा व आश्वलायन सूत्र यांचे अध्ययन करणारा असा हा मी, हे गुरो! आपणांस वंदन करीत आहे.

आपण दररोज संध्या करा वा न करा; परंतु एवढे तरी अभिवादन आपल्यापैकी प्रत्येकाला पाठ हे यावयालाच हवे; कारण त्यामुळेच आपली परंपरा कायम राहील.

आठल्ये घराणे-

इसवीसनाच्या ११ व्या शतकाचे सुमारास विद्यमान सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातून पाटणच्या दक्षिणेत १०/१२ मैलावर “ओटोली” या नावाचा जो गाव आहे तेथून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले. हल्ली जसे पुणे-कर, कोल्हापूर-कर, रत्नागिरी-कर असे म्हटले जाते, तसे आपल्या पूर्वजांना ते ओटोलीहून येथे आल्यावर त्या भागातील पूर्वीचे लोक त्यांना ‘ ओटोली-ये’ म्हणजेच ओटोली गाववाले असे संबोधू लागले व तेच आपल्या कुलाचे आडनांव झाले. या ‘ ओटोली-ये’ या आडनांवाचा दिनांक १६७६ चे श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रात तीन वेळा उल्लेख आहे. त्यावरून किमान तीन शतकांहून जास्त काळ आपले हेच आडनाव कायम असून, कोकणातील आपले मूलस्थान कसबा देवळे हेच होय.

आपले देव-

आपल्या घराण्याच्या देवतांचा नाममंत्र खालीलप्रमाणे आहे.

१.       ॐ श्री महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती

२.       लक्ष्मी-पल्लीनाथ

३.       भवानी खड्गेश्वर

४.       श्री महाविष्णु प्रमुख पंचायत देवताभ्यो नम:ll

यातील ॐ श्री महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती या तीनही देवता कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे देवालयात (म्हणजेच अंबाबाईचे देवालयात) आहेत.आजवर आपण लघुरुद्र- महारुद्र- अतिरुद्र आदि प्रकारे श्री शंकराची विशेष उपासना आपल्या या उत्सवात अनेकदा केलेली आहे, तर चालू साली, शतचंडी रुपाने आपण या देवतांची विशेष उपासना केलेली आहे. श्री लक्ष्मी- पल्लीनाथ हा पाली येथे आहे व तो आपला कुलस्वामी आहे, तर श्री भवानी खड्गेश्वर हा देवळे येथे असून, तो आपला आराध्य दैवत आहे. कुलस्वामी व आराध्य दैवत यांतील फरक जाणून घेतला पाहिजे. आपल्यासारख्या अनेक कुलांचा जो स्वामी (संरक्षक) आहे, तो कुलस्वामी; आणि एखाद्या घराण्याच्या मूळ पुरुषाने, आपल्या आवडीप्रमाणे, विशेष आराधना करण्यासाठी जो देव निवडला त्याचा आराध्य दैवत होय. श्री महाविष्णु प्रमुख पंचायतनांत, प्रमुख स्थानी श्री विष्णू स्थापून शंकर, गणपती, रवी व देवी (ना- नारायण-शं-ग-र-दे) असे ‘विष्णू पंचायतन’ स्थापून पूजा करतात. श्रीमत् जगतगुरू आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्मातील निरनिराळ्या उपास्य देवतांचा समन्वय करून, एकीकरणाचा जो प्रयत्न केला, त्याकरिता ही ‘पंचायतन पूजा’ सुरु केली. आपले आठल्ये कुटुंब श्रीमत् शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत मानते, त्यामुळे ही पंचायतन पूजा आपल्याही कुलात रूढ झाली असावी असे मला वाटते.

शिपोशी –

शिपोशी शाखेचे मूळ पुरुष विश्वनाथ भट्ट, केशव भट्ट, आठल्ये हे होत. त्यांना पुत्र पंच ते १) रुद्रभट २) बालंभट ३) सिंदभट ४)रामभट ५)बाबणभट असे होते. हेच शिपोशीतील पाच तक्षिमांचे मूळ पुरुष होत. त्यांना दि. १ जून १७१९ रोजी श्रीमत् शंभू छत्रपती, करवीर यांचेकडून शिपोशी गाव इनाम मिळून तशी सनदही मिळाली. त्यानंतर दि. ११ नोव्हेंबर १७२० रोजी श्रीमत् शाहू छत्रपती, सातारा यांचेकडूनही त्याच गावची इनामाची सनद मिळाली व वडील बंधू रुद्र भटजी यांचे नावे या दोन्ही सनदा होऊन त्या पंच बंधूस शिपोशी गाव इनाम मिळाला. त्यानंतर इ.स. १७२५ चे सुमारास ते शिपोशी येथे राहावयास आले. पण त्यामुळे देवळे येथील श्री खड्गेश्वराच्या दर्शन-पूजनाचा त्यांचा दररोजचा नियम अंतरु लागला. सबब, त्यांनी त्याचा प्रतिनिधी म्हणून श्री हरिहरेश्वर या देवस्थानची स्थापना केली. तेव्हापासून शिपोशीकर आठल्ये कुटुंबाचे श्री हरिहरेश्वर हे आराध्य दैवत बनले, व ते आजपर्यंत तसेच मानण्यात येत आहे. या देवतांबद्दलची सर्व माहिती देवस्थानचे अहवालात वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, हे आपण जाणतोच.

 

 

 कर्तबगार व्यक्ती –

आठल्येघराण्यामध्ये अनेक ख्यातनाम व कर्तबगार स्त्री- पुरुष होऊन गेले. आठल्ये घराण्याचे इतिहासाचे द्वितीय खंडात ती. दादांनी (विष्णू वासुदेव आठल्ये) अशा सदतीस व्यक्तींची चरित्रे दिली आहेत ती आपण सर्वांनी मुळातूनच एकदा तरी वाचावी अशी मी आपणांस खास शिफारस करतो. आजही आतापर्यंतच्या निरनिराळ्या भाषणात त्यापैकी निरनिराळ्या व्यक्तीचा उल्लेख झालेलाच आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलण्यात आपला जास्त वेळ न घेता, स्वागताध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे चार पिढ्यांचे शिपोशीकर आठल्ये कुटुंबीय माहेरवासिनींसह आजच आपण स्नेहसंमेलनाकरिता असे प्रथमच जमत आहोत. अशा वेळी, माझ्या पुढील पिढ्यांना आपल्या परंपरेचा वारसा काय आहे तो माझ्या दृष्टीने, आपल्या कुलाची काही वैशिष्ट्ये सांगून मी माझे भाषण संपविणार आहे.

काही वैशिष्ट्ये-

१.       आपल्यापैकी कित्येकांना हे माहीतही नसेल की श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रताप गडावर श्री भवानी देवीचे मंदिर बांधले त्यावेळी, त्या देवीचे पुजारी इनामदार आठल्ये हेच होते व त्याबद्दल मौजे बावधन तालुका वाई हा गाव त्यांजकडे इनाम चालत होता. त्या देवीचे विद्यमान पुजारी हडप हे मूळचे आठल्येच. मी प्रतापगडला गेलो होतो तेव्हा, तेथील पुजारी हडप यांचे कुटुंबास हीच माहिती प्रचलित असलेली ऐकिली व मला अतीव आनंद झला. श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी आपल्या कुळातील एक व्यक्तीचा असा साक्षात व महत्त्वाचा संबंध त्या काळीही होता ही गोष्ट समजून कोणाही आठल्ये व्यक्तीला अभिमानच वाटेल. हा पूर्वापार चालत आलेला ऋणानुबंध लक्षात घेऊनच काही वर्षांपूर्वी प्रतापगडाचे विद्यमान पुजारी हडप, सपत्नीक शिपोशी येथे येऊन आपल्या मूळ पुरुषाचे स्मरण करून गेल्याचे आपल्या सर्वांच्या स्मरणात असेलच. समस्त आठल्ये कुलाने विशेष अभिमान बाळगावा अशीच ही गोष्ट आहे.

२.       आपल्या कुलाची सत्याचरणाबद्दल विशेष ख्याती होती व आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही वादात, कोणत्या पक्षाची बाजू, सत्य आहे हे पाहण्याकरिता सरकार त्या पक्षास दिव्य करण्यास सांगत असे. (आजही स्पेशल शपथ अॅक्टखाली दोन्ही पक्षांच्या संमतीने, ठरलेली विशेष शपथ करणारांतर्फे कोर्टाचा निवडा होतो हे आपण जाणताच.) अशा प्रकारचे पहिले दिव्य, आठल्ये घराण्याचे उपलब्ध मूळ पुरुष कृष्णभट वामनभट यांचे ज्येष्ठ चिरंजीव बाबदेवभट कृष्णभट यांनी इ.स. १६९२ मध्ये देवळे महालाचे धर्माधिकरण व ग्रामोपाध्यायपण आपले आहे हे शाबित करण्याकरिता विजापूरच्या आदिलशाहीत दिव्य केले व ते ‘दिव्यासी पाख (खरे) उतरले’ असे त्यावेळेचे मजहरात वर्णन आहे. त्यावरून त्यांची आपल्या सत्तेविषयीची आत्मश्रद्धा व दृढनिश्चय व्यक्त होतात. तथापि ज्या मजहरात त्यांचा उल्लेख आहे, त्यात हे दिव्य कोणत्या स्वरूपाचे होते, ते कागद जळल्यामुळे समजण्यास मार्ग नाही असे इतिहास सांगतो. अशाच प्रकारचे दुसरे दिव्य इ.स. १७८९ मध्ये महादेवभटजी आबा आठल्ये यांनी श्री क्षेत्र वाई येथील ठिकाणी रविधोंड येथे पापविनाशन तीर्थानजिक कृष्ण नदीत उभे राहून केले. हे दिव्य करण्याचा प्रकार असा होता की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गळयाइतक्या पाण्यात उभे राहायचे. रात्रौ सरकारच्या चौकी पहाऱ्यात राहावयाचे व कोणत्याही प्रकारचे औषध आले, सुंठ, मिरी आदि खावयाचे नाही. याप्रमाणे सतत १० दिवसपर्यंत वर्तन करून कोणत्याही प्रकारचा आजार आला नाही तर दिव्य तडीस गेले असे समजावयाचे. असे सांगतात की त्यांनी १० दिवस पाण्यात उभे राहून सतत वेदघोष केला; त्यामुळे त्यांना शिंक किंवा जांभई आली नाही. मग ताप खोकला कुठला? यावरून त्यांची श्रद्धा, विश्वास, चिकाटी, मनोधैर्य व आत्मप्रत्यय विशेषत्त्वाने प्रतीत होतात. सत्यप्रियता व त्याकरिता पडेल ते दिव्य करण्याची तयारी हा आपला शिपोशीकर आठल्यांचा एक कुल्विशेश आहे.

३.       शिपोशी शाखेचे मूळ पुरुष केशवभटजी आठल्ये व त्यांची परमसाध्वी पत्नी लक्ष्मीबाई ही उभयता देवळे येथे राहत होती. त्यांना दोन पुत्र ते. एक अनंतभट व धाकटे विश्वनाथभट. अनंतभट यांस संतती नाही. विश्वनाथभटजी यांचे पांच पुत्र हेच शिपोशीच्या पांच तामिक्षांचे मूळ पुरुष हे मागे सांगितले आहेच. दुर्दैव असे की, केशव-लक्ष्मी दाम्पत्यावर सर्व प्रकारच्या आपदा कोसळल्या! त्यांचे जीवन हलाखीचे झाले!! त्यांना जिणेच नको असे वाटू लागले!!! कारण त्यांचे जीवनात त्यांस एक दिवसही सुखसमाधानाचा असा लाभला नाही. त्या बिकट परिस्थितीतही त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई कोंड्याचा मांडा करून आपल्याकडून होईल ती सर्व मदत आपल्या पतीस करतच होती. परंतु तशाच स्थितीत केशवभटजींचा अंत देवळे येथे झाला व त्यांची ती प्रेमळ तेजस्वी पतिव्रता सहधर्मचारिणीसती गेली! सती जाताना तिने आपल्या दोन मुलांना व इतर भाऊबंदांना असे निक्षून सांगितले, “मी व माझे भ्रतार यांनी आमचे आयुष्यात इतकी दु:खे, संकटे, कष्ट, हाल व दारिद्र्य अनुभविले आहे की तसला तो प्रसंग पुनरपि आमच्या वैऱ्यावरसुद्धा येऊ नये. यासाठी माझ्या वंशात आम्हा उभयतांची “केशव व लक्ष्मी”ही दुर्दैवी नावे कोणीही ठेऊ नयेत अशी माझी आज्ञा आहे.” त्यांच्या त्या आज्ञेचे ३०० वर्षे काटेकोर परिपालन आजतागायत शिपोशी शाखेच्या सर्व कुटुंबियांनी केले आहे. विशेष म्हणजे निम्मेवली शाखा व चौथाईवाली दिक्षित आठल्ये जात असतानाही चौथाईवाल्या आपल्या शिपोशी शाखेतच हा निर्बंध अव्याहतपणे कटाक्षाने विशेष श्रद्धापूर्वक आजवर पाळण्यात आलेला आहे. ही गोष्ट आम्हा त्यांचे वंशजांस विशेषच अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

४.       हजरजबाबीपणा हा आपल्या कुलाचा आणखी एक विशेष होय. त्याबाबतीत आपल्या कुलात अनेक व्यक्तीच्या आख्यायिका प्रचलित आहेत व यावरून शिपोशीकर आठल्यांचा हजरजबाबीपणा हे एक खास वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यापैकी एक किस्सा नमुना म्हणून सांगतो. पेशवाईत मोठ्या कष्टाने महादेव आबांनी नाना फडणीसांची भेट घेऊन आपले म्हणणे सांगण्यास सुरुवात केली. परंतु नानांनी “ जो तो पक्षकार आपले म्हणणे असेच एकतर्फी सांगत असतो” असे म्हणून विशेष लक्ष न देता, ते जिना चढू लागले. महादेव आबांना ते सहन झाले नाही. ते त्वेषाने म्हणाले पेशव्यांचे राज्य क्षीरसागर आहे असे आजवर ऐकत होतो पण आज ते क्षारसागर झाल्याचे अनुभवास आले. हे त्यांचे शब्द नानांना फार झोंबले आणि लगेच फिरून, ते आबांस म्हणाले की “या तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय समजायचा?” आबा बोलले “चौकशी करण्यापूर्वीच ज्या राज्यात निकाल दिला जातो ते राज्य क्षारसागरच होय. जबाबदार अधिकारी न्यायाकडे दुर्लक्ष करू लागले म्हणजे राज्यात उतरती कळा लागली असेच म्हटले पाहिजे.” आबा तत्काळ म्हणाले, “चौकशीअंती माझे बोलणे खोटे ठरले तर हे यज्ञोपवीत काढून आपल्या पायांवर वाहीन. आजन्म ब्राह्मण्याबाहेर राहीन.” त्या काळात नानांचा दरारा एवढा होता की त्यांचेपुढे सामान्य मनुष्यास बोलणेसुद्धा कठीण जात असे. पण महादेव आबांचा आत्मविश्वास व प्रत्त्युत्पन्नमती यांचे जोरावरच त्यांनी त्या दिवशी अखेर नानांनाच जिंकले यात शंका नाही. समस्त शिपोशीकर आठल्ये कुलात वरील सर्व गुण अनुवांशिकरीत्या आजतागायत चालत आलेले आहेत हे आपणा सर्वांनाच  भूषणास्पद होय.

५.       शिपोशीची मराठी शाळा ही त्या वेळच्या मुंबई इलाख्यातील ६ वी शाळा होय. आपल्या गेल्या चार पिढ्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले आहे. मुंबई इलाख्यात ६ वी शाळा सुरु करणारे आपले पूर्वज हे केवढे शिक्षणप्रेमी असतील हे आपण कल्पनेनेच जाणावे. यावरून ज्ञानलालसा हे आपल्या कुलाचे एक आणखी वैशिष्ट्य होय हेच दिसून येते.

६.       कै. जनूकाका आठल्ये यांनी रत्नागिरी येथे इ.स. १८५३ ते १८९० पर्यंत “जगन्मित्र” या नावाचे साप्ताहिक आपल्या शिळाप्रेसवर चालविले. वार्षिक वर्गणी ५ रु. होती. त्यात महाराष्ट्रातील विद्वानांपासून तो मिस्टर कँडीसाहेब व मुंबईचे गव्हर्नरपर्यंत वर्गणीदार होते. त्याकाळात जगन्मित्र साप्ताहिकास, ‘रत्नागिरीचे गॅझेट’ म्हणत. ज्ञानाचा प्रचार व प्रसार वृत्तपत्राचे माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्या काळातही त्यांनी केला. हे खास गौरवास्पद नव्हे काय? आज हेच कार्य शिक्षणसंस्थाद्वारे चालते, हे आपण जाणतोच.

७.       सार्वजनिक कार्ये निर्व्याज प्रेमाने, निरलस वृत्तीने, नि:स्वार्थीपणे अव्याहत करीत राहणे हा आपल्या कुलाचा सर्वात प्रमुख वारसा होय. आजचे प्रमुख पाहुणे श्री. आठल्ये गुरुजी (आमदार) हे आपण सर्वसामान्यपणे समजतो तसे “देवळेकर” नव्हेत. ते मूलत: शिपोसकर होते व आहेत. (तक्षिम चौथी- आठल्ये घराण्याचा इतिहास प्रथम खंड पृष्ठ ३० पहा) त्यामुळे त्यांचेबद्दल आपणा सर्वांनाच एक विशेष प्रेम, आदर व अभिमान वाटतो. सामाजिक कार्य कसे करावे याचा त्यांनी, जणू एक आदर्श उभा केलेला आहे, तो सर्वांनाच सदैव आदरणीय व अनुकरणीय असाच आहे.

८.       वैशिष्ट्यपूर्ण संस्था काढून त्या तशा सातत्याने चालविण्यात आपले कुल विशेष प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील पहिली पतपेढी, मुष्टीफंड संस्था, इनामदार पतपेढी, मुराद्पुरची जंगल सोसायटी, देवरुखची संचयकारी सोसायटी किंवा रत्नागिरी जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघासारखी सहकारी सोसायटी म्हणून रजिस्टर करण्यात आलेली संस्था यांची वानगीदाखल नावे पुरेशी आहेत.

९.       आपल्या देवावरील श्रद्धा हीच आपणा सर्वांची एकी सदैव अभंग राखण्यास विशेष कारणीभूत होईल. कारण देवस्थाने ही जास्त चिरस्थायी असतात. हे दूरदर्शी विचाराने जाणून ८० वर्षांपूर्वी श्री हरिहरेश्वर देवस्थान, शिपोशी ही संस्था स्थापन करणारे आपल्या पाठीमागच्या पिढीतील सर्व संस्थापक हे विशेष उल्लेखानास, आदरास व नित्य स्मरणास पात्र आहेत. त्यांनी संस्था स्थापन केली तेव्हा “लोकशाही” हा शब्दही ऐकिवात नव्हता! अशा काळी घटना तयार करून त्यांनी जी संस्था स्थापन केली ती विविध दृष्टीने अभूतपूर्व, अलौकिक व अजोड अशीच होती व आहे. त्या संस्थेची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती अशी-

या संस्थेत सहभागी होण्यासाठी वर्गणी नाही. शिपोशीकर सज्ञान आठल्ये स्त्री व पुरुष हा त्या संस्थेचा आपोआप तहहयात सभासद होतो. त्यामुळे संस्थेचे सभासदेचे रजिस्टर नाही व सभासदांचा राजीनामा नाही. श्री हरिहरेश्वर हा शिपोशीकर दैवत असल्यामुळे पांच वर्षाकरिता एक स्थानिक कमिटी निवदावयाची व तिनेच सर्वांचे प्रतिनिधित्व करून देवस्थानाचा कारभार चालवावयाचा असे कार्य गेली ८० वर्षे अव्याहतपणे चालू आहे. पहिल्या दिवसापासून आजतागायत देवस्थानाकडे आलेल्या पैसा व अन्य वस्तूंची पावती ही देनागीचीच पावती आहे. त्यामुळे देणगी देणाऱ्याला देणगी दिल्याने कोणताच हक्क प्राप्त होत नाही. या सर्व गोष्टीमुळेच श्री हरिहरेश्वर देवस्थान, शिपोशी हा एक प्रायव्हेट ट्रस्ट ठरू शकला हे केव्हाही विसरता कामा नये. वार्षिक सभेत प्रत्येक गोष्टीचा साधक बाधक विचार होतो व एकदा निर्णय घेतला गेला की तो सर्वांचाच निर्णय असे मानले जाते व त्याप्रमाणे सर्वजण सदैव वागतात. त्यामुळे सर्व ठराव एकमताने होतात. त्यात बहुमत, अल्पमत या विचाराला स्थानच नव्हते व नाही. “श्री हरिहरेश्वर भक्त” एवढी एकच भावना सर्वांची असते. कोणाचेही आपसात इतर काही गोष्टीत मतभेद असल्यास ते देवालयाचे पोवळीचे बाहेर ठेवावयाचे व देवालयात आल्यावर कमी तेथे आम्ही या भावनेने वागावायचे व पडेल ते काम करावयाचे अशी सर्वांचीच वृत्ती आहे. देवाचे दरबारात कोणी मोठा नाही कोणी लहान नाही, गरीब नाही श्रीमंत नाही, सुशिक्षित नाही अशिक्षित नाही. प्रत्येकाचा अधिकार असलाच तर तो फक्त सेवेचा. विशिष्ट सेवा सातत्याने करावी व तो सेवेचा विशिष्ट अधिकार सर्वांनी मानावा अशीच परंपरा आहे.पण ती सेवा करणारा वेळी हजर नसला तर त्याचे काम कोणीही करावे असाही शिरस्ता अजयागायात चालू आहे. श्री हरिहरेश्वर भक्त हीच सर्वांची एकमेव पात्रता (Qualification) असल्यामुळे, या देवालयात वैयक्तिक मानापमानास स्थानच नाही. जो तो आपल्याकडून होईल तेवढी सेवा करण्याची शिकस्त करतो व त्यातच धन्यता मानतो. अशी ८० वर्षापासूनची लोकशाही विरहित बसलेली घडी रूढ आहे. आपण सर्वसाधारणपणे आपल्या घराबाहेर सार्वजनिक स्वरूपाच्या सर्व कामात लोकशाही मानतो. कारण घरचा कारभार हा नेहमीच कटाक्षानेराजकारणातीत असतो. त्याच न्यायाने, तीच प्रथा गेली ८० वर्षे या देवस्थानात अव्याहतपणे चालू आहे; कारण संस्था ही एक कुटुंबाचीच मानली जाते. स्थानिक समितीचे निवडून दिलेले सभासद हेच आपले शिपोशीकर आठल्ये कुटुंबियांचे एकमेव प्रतिनिधी, असे सर्वजण मानतात व त्या न्यायाने सर्व समितीचे सभासदही यथार्थपणे सदैव वागत असतात. त्यामुळे व विशेषत: सदैव राजकारणातीत राहिल्याने व केवळ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक एवढ्याच क्षेत्रात सातत्याने कार्य केल्यामुळे, कालाचे ओघात ती परंपरा टिकली आहे. एवढेच नव्हे तर, शिपोशीकर आठल्ये कुटुंबियांची एकी कायम ठेवण्यास सदैव कारणीभूत ठरली आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी विशेष नोंद घ्यावी; असे या संमेलनाचे निमित्ताने, मी अगदी मन:पूर्वक प्रार्थितो. आपली अशी अभंग एकी आहे. तोपर्यंत कसलीही चिंता करणेस नको. विविध वैशिष्ट्यांपैकी काही वैशिष्ट्ये सांगितली. त्यांची जतन- जपणूक व जोपासना करणे हेच समस्त शिपोशीकर कुलाचे प्रथम कर्तव्य होय असे मला वाटते.

शिपोशीकर आठल्यांची कुल-शील परंपरा यथाशक्ती-यथामती, आपल्यासमोर निवेदन करण्याचा अल्प प्रयत्न केला आहे. तो आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा हीच खास विनंती. या पहिल्याच संमेलनाचे अध्यक्ष होण्याचे सद्भाग्य मला लाभले. ही मी एक श्री हरिहरेश्वराची कृपाच समजतो. वाडवडिलांचा वारसा समजून घेऊन तो संपादन करणे. शक्य तर त्यात भर घालणे व समस्त शिपोशीकर आठल्ये कुलाची एकी सदैव अभंग राखूनच तो वारसा पुढिलांचे हाती सुपूर्द करणे, हेच प्रत्येकाचे कर्तव्य; व या संमेलनाचा तोच यथार्थ असा संदेश होय असे मला वाटते.

यानंतर वरील विविधांगाचा विचार करता, माहेरवासिनींसह समस्त शिपोशीकर आठल्ये कुटुंबियांकरिता, यापुढे शक्य होईल तेव्हा, एक शिपोशीकर आठल्ये प्रतिष्ठान स्थापन करण्यात यावे व त्याचे मार्फत, राजकारणातीत राहून आपल्या सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गरजा भागाविणेत याव्यात. बदलत्या काळात अशी काही व्यापक व्यवस्था करण्याशिवाय तरणोपाय नाही असे मला वाटते. याचा विचार विशेषत: पुढीलांनी करावा हेच मला आज प्रामुख्याने आपल्या निदर्शनास आणावयाचे आहे.

शेवटी, हे पहिले संमेलन यशस्वी करण्याकरिता आपण सर्वांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या सहकार्याबद्दल अगदी मन:पूर्वक हार्दिक आभार मानून श्री हरिहरेश्वर आपणा सर्वांचे सर्व मनोरथ सदैव पूर्ण करो असे खालील श्लोकाने प्रार्थिती व माझे हे जरा लांबलेले भाषण संपवितो.

 

 

सर्वेऽपि सुखिन: सन्तु l सर्वे सन्तु निरामया: l

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात्

 

 

श्री हरिहरेश्वर महाराज की जय

 

 

 

 

***************************************************